Skip to main content

रतन टाटा

१९९५ चा काळ होता. व्हिडिओ प्रोजेक्टर बनवणाऱ्या एका खाजगी कंपनीत 'सेल्स ऑफिसर' म्हणून वेठबिगारी करतं होतो. नावाचाचं 'ऑफिसर', औकात सेल्समनचीच!

टाटांची औरंगाबादमध्ये एक हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे. त्यांना तिथल्यासाठी दोन प्रोजेक्टर हवे होते. किंमतीविषयी चर्चा करण्यासाठी त्यांच्या गोन्साल्वीस नावाच्या बड्या अधिकाऱ्याने मला मुंबईत गेट वे ऑफ इंडियासमोरील ताज हॉटेलच्या मागे असलेल्या कार्यालयात सकाळी साडेआठलाच बोलावले होते.

एवढ्या मोठ्या समुहाची ऑर्डर कंपनीतल्या आम्हा सगळ्यांनाच खुप महत्त्वाची. उशीर व्हायला नको, म्हणून सकाळी चहासुद्धा न घेता, टापटीप होऊन सकाळी आठलाच तिथे पोहोचलो आणि रिसेप्शनला वर्दी दिली.

"साडे आठ बोला था ना तुमको? इतना जल्दी कायको आता?"

साठीतली म्हातारी रिसेप्शनीस्ट वसकन अंगावर आली.

"सॉरी मॅडम. मैं रूकता हूं"

गरजवंताला अक्कलच काय आत्मसन्मानही नसतो!

साडे-आठ झाले, नऊ वाजले, दहा वाजले, मग अकरा वाजले! पण मला काही बोलावणे येईना. धाडस गोळा करून परत त्या कैदाशिणीकडे गेलो.

"वेट सम टाईम. मिस्टर गोन्साल्वीस इज बिझी"

किती वेट करू? 

पोटात कावळे ओरडत होते! खास तयारी करायची म्हणून पहाटेच उठलो होतो. त्या जागरणामुळे वा भुकेनेही ग्लानी येते होती. खाली जाऊन काही खावे म्हंटले, पण तेवढ्यात या गोन्साल्वीसबाबाने बोलावले तर?

हातची ऑर्डर जायची! ऑर्डर गेली तर नोकरीही जायची!

नेटाने बसूनच राहिलो!

दुपारचा एक वाजला असेल, माझ्या डाव्या बाजूला असलेल्या एका 'लिफ्ट'चा दरवाजा उघडला. दोन ऐटबाज तरूण पुढे आणि त्यांच्या मागे पाच सहा जणं. मला ओलांडून ते माझ्या उजव्या बाजूला असलेल्या कॉन्फरन्स रूमकडे जात होते.

त्या दोन तरूणांमागील व्यक्तिला मी बघितले आणि अक्षरशः थरारलो! खुद्द रतन टाटा!

दमदार पावले टाकत ते वेगात चालत होते. ते पुढचे दोनजण त्यांचे शरीररक्षक आणि मागचे 'ताज'चे ऑफिसर असावेतं.

दहा बारा सेकंदच ते समोर असतील. माझ्यासमोरून अक्षरशः तीन फुटांवरून ते गेले. मी मोहरलो! अलभ्य दर्शन! तहान-भूक सारे विसरलो! दिवस सार्थकी लागला होता!

रतन टाटा महिन्यातून कधीही एकदा आकस्मिकपणे 'हॉटेल ताज' ची तपासणी करायला येतातं. ते कधी येणार याची कोणालाही कल्पना देत नाहीत! माझ्या सुदैवाने तो दिवस आजचा होता! 

पण ते सकाळी आठलाच पोहोचल्याने, माझ्या दुर्दैवाने, आमचा गोन्साल्वीस साहेब सकाळपासूनच त्यांच्या बरोबर व्यग्र होता!

दोन वाजले. 

कॉन्फरन्स रूमचा दरवाजा उघडला. एकजण पळत पळतं लिफ्ट उघडायला धावला. मघासारखेचं खाडखाड बुट वाजवतं सगळे बाहेर आले, लिफ्टकडे चालू लागले.

मी एकदम पुतळा. रतन टाटा माझ्यासमोरून तिनच फुटांवरून चाललेतं....

माझ्यासमोर येऊन ते अचानक थांबले. वळून त्यांनी त्या रिसेप्शनीस्टला विचारले,

"व्हाय इज धिस जंटलमन वेटींग हियर?"

गडबडलेल्या त्या रिसेप्शनिस्टने मी गोन्साल्वीस यांना भेटायला आलोय, असे सांगितले.

हा आमचा गोन्साल्वीस साहेब त्यांच्यामागे असणाऱ्या चौघांमध्येच होता!

गोन्साल्वीसकडे वळून ते म्हणाले, " प्लिज अटेंड हिम, मि. गोन्साल्वीस. हि इज हियर सिन्स ऑन आवर. व्हाय आर यू वेस्टिंग हिज टाईम?"

गोन्साल्वीस साहेबाने त्वरेने मला त्याच्या ऑफिसात घेतले. चहा पाजला, बिस्किटे खाऊन घातली! नंतर तर ऑर्डरही दिली!

रतनजी समोरून गेले, तेव्हा त्यांना माझी उपस्थिती जाणवली असेल, असे वाटलेही नव्हते!

एका यकश्चित सेल्स ऑफिसरच्या वेळेची त्यांना किंमत होती. 

मी तासभरापासून तिथे बसलो आहे, असा त्यांचा भ्रम होता. उपाशीपोटी मी सहा-सात तासांपासून तिथे बसलेलो होतो, हे जर त्यांना कळते तर?

२००८ च्या सुमारास दिल्ली विमानतळावर क्ष-किरण तपासणीसाठी मी रांगेत उभा होतो. संध्याकाळची वेळ. विमानतळावर तौबा गर्दी! त्यातल्या त्यात छोटी रांग बघून मी शेवटी उभा राहिलो. थोडा वेळ गेला असेलं, अचानक पुढे रांगेत एकदम खळबळं जाणवली. रांगेत पुढे असणारे चार-पाच जण सहाव्या क्रमांकावर असलेल्या व्यक्तिला पुढे जाण्याचा आग्रह करतं होते आणि ती व्यक्ती जागेवरून हलतं नव्हती!

सहाव्या क्रमांकावर खुद्द रतन टाटा उभे होते!

रांगेतल्या त्यांच्या पुढे असणाऱ्या व्यक्तिने सहज मागे बघितले, तर त्याच्या मागे दस्तुरखुद्द रतन टाटा!

तो अवाकच झाला! त्याने त्यांना त्याच्यापुढे जावे, अशी विनंती केली. तोवर पुढच्यांनाही आपण रांगेत कोणापुढे आहोत, याची कल्पना आली. तेही बाजूला सरले, पण रतनजी आपली जागा सोडेना!

"थॅन्क्स, बट इट्स ओके. इट विल टेक हार्डली टेन मिनटस्" म्हणतं टाटा सगळ्यांना परत रांगेत जायला सांगू लागले! गोंधळ ऐकून तिथला सिक्युरिटी ऑफिसर आला. 'जनरल पब्लिक'च्या रांगेत रतन टाटांना उभे बघून त्यालाही आश्चर्य वाटले.

त्याने टाटांच्या हातातली छोटी बॅग घेतली.

"सरं, आईये, आगे जाते है" 

"नो नो. थॅंक्यू ऑफिसरं"

रतन टाटांनी आपला हट्ट सोडला नाही! ते रांगेतल्या आपल्या क्रमांकानुसारच पुढे सरकले!

आजुबाजूचे सगळे सिक्युरिटी, आमच्या आणि इतर रांगेतले सारे आदराने त्यांच्याकडे बघतं होते!

स्वत:ची खाजगी विमाने असणारा, एका विमान कंपनीचा मालक असलेला, बलाढ्य टाटा समुहाचा सर्वेसर्वो असलेला एक महानायक एखाद्या सामान्य नागरीकासारखा सुरक्षा तपासणीसं सामोरा गेला!

विमानतळांवर विशेष वागणुकीची आणि सवलतींची अपेक्षा ठेवणाऱ्या राजकारणी वा चित्रपट तारे तारका यांच्या अंगवळणी पडलेल्या ऊद्दामगिरीच्या पार्श्वभूमीवर रतनजींचा साधेपणा त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिक तेजःपुंज करून गेला!

संस्कृत मध्ये एक सुंदर सुभाषित आहे.

"यथा नमन्ति पाथोभिः पाथोदाः फलदाः फलैः ।

नमन्ति विनयेनैव तद्वदुत्तमपूरुषाः ॥"

फळांनी बहरलेले झाडचं वाकते, झुकते! नम्र होते. तद्वत विद्वान, ऊत्तम पुरूष सदैव विनयाने झुकलेला असतो!

हजारो वर्षांपुर्वीच्या या सुभाषिताला ही असली थोर मंडळी अजुनही खोटे पडू देत नाहीत!

- रवी वाळेकर




Comments

Popular posts from this blog

मनाची अफाट शक्ती

मनाची अफाट शक्ती लुईस या एक अमेरिकन महिला होत्या. त्यांच्या पूर्वायुष्यात वयाच्या 5-15 वर्षांपर्यंत त्यांच्यावर भरपूर शारीरिक अत्याचार झाले. बलात्कार झाले. त्यामुळे त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच इतका नकारात्मक होता की हे संपर्ण जगच वाईट आहे. सर्व पुरुष हे घाणेरडेच आसतात व मी जगायला लायक नाही. ख्रिश्चॅनिटीनुसार त्या ‘नन’  होतात व त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक पुस्तके वाचतात. पुढे वयाच्या 40  व्या वर्षी त्यांना कॅन्सर होतो. जेव्हा त्यांच्या हे लक्षात येते की ज्यांनी हे कृत्य करायचं ते करून निघूनही गेले; त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही. त्रास (कॅन्सर) कोणाला झालाय तर मला. कारण इतकी वर्षं त्या सर्वांबद्दलच्या सर्व नकारात्मक भावना (राग, द्वेष, घृणा) मी धरून ठेवल्या आहेत. जर मला यातून बाहेर पडायचे असेल तर त्या सर्वांना माफ करणे खूप गरजेचे आहे. बरं ज्यांनी ते कृत्य केलं, ते माफ करण्यासारखं होतं का? तर आपल्या दृष्टीने नक्कीच नाही. पण ‘लुईस हे’ यांनी मनाची स्वच्छता केली. त्या सर्व व्यक्तींविषयी मनात असलेला सर्व राग बाहेर काढून त्या सर्वांना मनापासून माफ केले व कोणतेही ऑपर...