Skip to main content

वारस

 वारस     



      "ही इज स्टेडी नाउ, रिकवरींग फास्ट." मला अर्धवट ग्लानीत हा आवाज ऐकू आला. नक्की हा शांतीचाच आवाज!

      मी हळूहळू डोळे उघडले. मला क्षणभर कळेचना मी कुठेय? मग आठवू लागले, 'आम्ही पाच जण मुंबईहून ट्रीप साठी म्हणून केरळला आलो होतो दहा दिवसांसाठी, गेल्या दोन दिवसांपासून केरळचे निसर्ग सौंदर्य बघत भटकंती करत होतो. 

      धमाल चालु होती. विसरून गेलो होतो, 'मुंबई हॉस्पिटल चे आपण डॉक्टर्स आहोत वगैरे',  त्या नादात पथ्य सगळी गुंडाळून ठेवली होती......आणि व्हायचं तेच झालं, माझं अल्सर चं जुनं  दुखणं उफाळून आलं आणि प्रचंड पोट दुखू लागलं,  उलट्या होऊ लागल्या आणि पुढचं मला आठवेना....

      "कसं वाटतय आता?" माझी पल्स पहात डॉक्टर विचारत होत्या, आणि माझी नजर त्यांच्या चेहऱ्यावर खिळली होती. ती नक्की शांतीच होती. पण मग? तिने मला ओळखले नव्हते का? तिचा चेहरा इतका निर्विकार कसा राहू शकतो? 

    "ठीक", मी तिच्या डोळ्यात पाहून बोललो. पण तिथे मला कसलेच ओळखीचे भाव दिसले नाहीत. 

      माझे चारी दोस्त माझ्याजवळ होते. त्यांच्याकडून मला कळाले,  की आम्ही होतो त्या ठिकाणच्या जवळ हेच एक हॉस्पिटल होते, छोटेसे. 

     गेले अर्धा तास मी ग्लानीत होतो. साईट सिईंग ला आल्यामुळे औषधे लॉज वरच राहिली होती. आता ट्रिपचा विचका झाल्याचे त्यांच्या डोळ्यात मला दिसत होते. मी त्यांच्याशी चर्चा करून त्यांना ट्रिप कंटिन्यू करायला सांगितले. आणि उषा, माझी डॉक्टर पत्नी, जी मुंबईत आमचे हॉस्पिटल सांभाळत थांबली होती, तिला फोन करून सिच्युएशन सांगितली.

     प्रथम तिने मला खूप झापलं. मी पथ्य मोडलं असणार हे तिला कळालं. वैतागली ती! तिकडचे सगळे आवरल्या शिवाय तिला निघताच येणार नव्हतं. वैतागून, "उद्या निघेल फ्लाईटने, रात्री पर्यंत पोहोचेल", असे म्हणून तिने फोन ठेवला. 

     माझे दोस्त गेले. तसंही त्यांना तिथे राहायला जागा नव्हतीच. आता सुमारे 24 तास मी एकटाच राहणार होतो. डॉक्टरांची अचूक औषधी आणि सिस्टर अगस्था यांच्यामुळे पुढच्या पाच-सहा तासातच मला खूपच बरं वाटू लागलं. 

      आता रात्रीचे जवळजवळ नऊ वाजले होते. दोन मुलांना डॉक्टरांनी माझ्यासोबत झोपण्यास बोलावले, आणि त्या दोघी दवाखान्याच्या आवारातील त्यांच्या घरी गेल्या.

      सिस्टर ने मला डॉक्टरांच्या घरून मऊ भात शिजवून आणून दिला. मला ओशाळं वाटलं. पण काय करणार? त्या गावात हॉटेलही नव्हतं.

     सकाळी मला खूपच बरं वाटत होतं. संध्याकाळी उषा आली की मी निघणार होतो. त्या आधी मला खात्री करून घ्यायची होती, 'ती नक्की शांतीच होती का?' गेल्या पस्तीस वर्षात माझ्या प्रमाणे ती सुद्धा काही फारशी बदलली नव्हती. पण मग ती मला ओळखतच नव्हती.

     तितक्यात उषा चा फोन आला, प्रचंड पावसाने मुंबई तुंबली होती, सगळ्या फ्लाइट्स आणि ट्रेन्स 24 तासांसाठी कॅन्सल होत्या. "मी बरा आहे. तू काळजी करू नकोस. मीच येईन आता तिकडे,"असे तिला सांगून मी फोन ठेवला.

     सकाळचा ब्रेकफास्ट ही मला डॉक्टरांच्या घरूनच आला. सकाळी मला तपासताना मी याबद्दल डॉक्टरांना बोललो, तेव्हा, "अहो तुम्ही आमचे पाहुणे आहात", असं त्या म्हणाल्या. शेवटी मी ठरवले दुपारी ओपीडी जरा कमी झाली की डॉक्टरांना विचारायचेच. 

     अचानक दुपारी बारा साडेबारा पासून जुलाब उलट्या यांचे पेशंटस सुरू झाले. डॉक्टर आणि अगस्था यांची अगदी धावपळ सुरु झाली. मला मात्र आता पडून राहवेना. मी कधी पेशंट पाहू लागलो, आणि डॉक्टरांना मदत करू लागलो, हे मलाच कळले नाही. 

     संध्याकाळी पाच वाजेपर्यंत परिस्थिती बरीच आटोक्यात आली. आता मीही थकलो होतो गावातीलच कोणीतरी आमच्या तिघांसाठी जेवण आणले होते. बहुदा डॉक्टरांनी सांगितले असावे. मला आवडत असे तशी मस्त साजूक तुपातली खिचडी मला मिळाली. आम्ही तिघेही तिथेच जेवलो. 

      इतक्यात एक फोन आला आणि "मी लगेच निघते", असे मल्याळम मध्ये म्हणून डॉक्टर त्यांच्या केबिनमध्ये गेल्या. मागोमाग आस्थाही गेली. "शेजारच्या गावी एक बाई अडलीय. मी लगेच जाते. तू इथेच थांब,  अजून गावातून काही पेशंट येऊ शकतील", एकीकडे बॅग मध्ये आवश्यक ती मेडिसिन्स आणि इक्विपमेंट्स टाकत डॉक्टर अगस्था शी बोलत होत्या. 

     मी आत जावं की नको हा विचार करत दाराशीच घुटमळत होतो. इतक्यात अगास्था म्हणाली, "मग इथले पेशंट.....?"

      "ते बाहेरचे पाहुणे डॉक्टर हँडल करतील ना. तू काळजी नको करूस, ते गोल्ड मेडलिस्ट आहेत," डॉक्टर म्हणाल्या. 

      मी दिग्मूढ झालो. म्हणजे ही शांतीच आहे !! किती सोबर आणि पोलाईटलि वागतेय ती माझ्याशी, इतकं सगळं होऊनही! पण मग ती इकडे कुठे? आणि ही अगास्था कोण? मला या प्रश्नांची उत्तरे मिळाल्या शिवाय चैन पडणार नव्हती. 

झटकन् गाडी काढत शांती निघून गेली.

     अगास्था बाहेर येऊन बसली. पेशंट येत होते, पण सकाळी इतकी रश नव्हती. मी पेशंट पहात होतो. अगास्थाला काही सांगावं लागत नव्हतं, खूप हुशार होती ती! 

     मी अधून मधून तिच्याशी बोलत माहिती काढून घेत होतो. शांति सुमारे पस्तीस वर्षापूर्वी या गावात आली होती. म्हणजे त्या घटनेनंतर शांतीने मुंबई कायमची सोडली तर? 

       मी आणि शांती एकाच दिवशी आमच्या कॉलेजमध्ये आलो होतो, एम बी बी एस साठी! प्रथम दर्शनीच शांतीचे डोळे आणि तिचा आवाज मला खूप आवडला होता. तिचे डोळे एखाद्या डोहा सारखे होते, गूढ पण रम्य !

      ती खूप हुशार आणि मेहनती होती. अभ्यास आणि इतर सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये उत्साहाने भाग घ्यायची. पण विनाकारण कोणाला सलगी करू देत नसे. 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' अशी तिची जीवन शैली होती. 

      मी तिच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झालो होतो. हळूहळू आमची मैत्री फुलू लागली. मी तर कधीच तिला माझी लाईफ पार्टनर म्हणून ठरवून टाकली होती. कित्येकदा मी तिच्याशी सूचकतेने बोलायचो, पण ती कसलाच रिस्पॉन्स देत नसायची. 

       लास्ट इयर ला मी गोल्ड मेडल मिळवले, तर शांती कॉलेजमधून तिसरी आली. आम्ही दोघेही एकाच हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत होतो. मी बरेचदा तिच्याशी, 'वुड बी हजबंड' सारखा वागायचो, पण ती नावाप्रमाणेच शांत असायची. फक्त तिचे डोळे आणखी गूढ व्हायचे. 

      शेवटी एक दिवस मी तिला संध्याकाळी एका हॉटेल मध्ये घेऊन गेलो, आणि मस्त फिल्मी स्टाईल प्रपोज केले. तिने माझे गुलाबाचे फूल घेतले, पण ती म्हणाली," तुला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे का?" तिचे डोळे भरून आल्या सारखे मला वाटले. 

     "हो, तू अनाथाश्रमात राहतेस हे तर सगळ्या कॉलेजलाच माहिती आहे. पण मला काहीही प्रॉब्लेम नाही. आणि माझ्या आई-वडीलांची मी समजूत काढली आहे. आफ्टर ऑल तुझ्यासारखी मेहनती, हुशार, शांत, संस्कारी मुलगी लाईफ पार्टनर म्हणून कोण नाकारेल? माझ्या आई-बाबांनी तुला भेटायला बोलावले आहे. कधी येतेस? जाऊया आत्ता?"

       "त्या आधी तू उद्या संध्याकाळी चार वाजता आश्रमात ये," शांती मला म्हणाली. मी अक्षरशः हवेत तरंगत होतो. स्वप्न सत्यात उतरण्यास सुरुवात झाली होती. 

     दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी बरोबर चारला आश्रमात गेलो. आश्रमाच्या बाबाजींनी माझे स्वागत केले. ते एक गंभीर, भारदस्त व्यक्तिमत्व होते. बाबाजी हे नाव त्यांना एकदम सार्थ ठरत होते. 

      सुरुवातीला त्यांनी मला त्यांचा सर्व आश्रम फिरून दाखवला. तो छोटासा अनाथ आश्रम होता. पंधरा मुले मुली तिथे होती.

      बाबाजी म्हणाले,"शांती आमचे भूषण आहे. ती  जन्मतःच इथे आणून ठेवलेली होती. तिचे आईबाप, धर्म-जात, खानदान काहीही आम्हाला माहिती नाही. इथल्या सगळ्या मुलांना माझं नाव लावलं जातं. पण ती खूप हुशार आहे. गेले चार-पाच वर्षे तुम्ही परस्परांना ओळखता".

     "बाबाजी मला काही प्रॉब्लेम नाही," मी बोलू लागलो.

      पण मला मध्येच थांबवून बाबाजींनी माझ्या हातात एक फाईल दिली कपाटातून काढून. "तू डॉक्टर आहे, तुला सर्व समजते. हे बघ!" ते म्हणाले.

     आश्रमाच्या नियमानुसार शांतीच्या दरवर्षीच्या चेकअपच्या रिपोर्टची ती फाईल होती. सतराव्या वर्षी झालेल्या चेकअप चे रिपोर्ट मी पहात होतो. 'शांतीला गर्भाशयच नव्हते,' परमेश्वराकडून लाखात एखाद्या वेळी अशी गफलत होते. 

      मी सुन्न झालो.

 शांती शी लग्न करून मी कधीच बाप बनू शकणार नव्हतो, असा त्याचा अर्थ होता. माझे आई-वडील हे खपवून घेतील? खुद्द मला तरी हेच चालेल? 

      माझ्या बाबांना मी आणि माझी ताई आम्ही दोघेच अपत्य. तिचेही लग्न झालेले. मोठ्या घराण्यात तिला दिलेले होते. आमच्या घरी गावाकडे वीस एकर बागायती शेती, मोठं घर, मुंबईत फ्लॅट, चारचाकी, वडील बँकेत सर्विसला........ इतकं सगळं असून केवळ माझ्या हट्टासाठी शांती ला पत्करायला ते तयार झाले. पण या अफाट इस्टेटीचा वारस? तोसुद्धा अनाथाश्रमातील? पटेल हे त्यांना? आणि मला तरी? बायको अनाथाश्रमातील आणि मुलंही तसलेच? 

      बराच वेळ मी नुसताच बसून होतो. मध्येच बाबाजींनी चहा देऊन मला भानावर आणले. कसाबसा चहा घेऊन शांती कडे न पाहता बाबाजींना, "मी नंतर कळवतो", असं म्हणून आश्रमाच्या बाहेर पडलो......  पुन्हा कधीच न येण्यासाठी! शांती हा विषयच मी फार फार दुःखाने मिटवून टाकला.

      पुढे मी पी.जी. केले. लवकरच माझे उषा शी लग्न झाले. तीही डॉक्टरच आहे. आमचे छोटेसे हॉस्पिटल आम्ही सुरू केले. धो धो पैसा कमावत होतो. दोन गोंडस बाळांचे आईबाप ही बनलो. मुले ही गुणी होती. खूप शिकून त्यांच्या आवडत्या क्षेत्रात मनाजोगं शिक्षण घेण्यासाठी परदेशी गेली दोघही. तिकडचेच जोडीदार शोधून तिकडेच स्थायिक ही झाली. एकेकदा आम्हीही त्यांच्याकडे जाऊन आलो. पण आता इथे दोघंच होतो. आठ दहा दिवसातून कधीतरी मुलांचा फोन येई तेवढेच!भेटून तर तीन-साडेतीन वर्षे झाली होती. 

      आयुष्याच्या संध्याकाळी आता या रिकाम्या खोपीत दोघंच राहात होतो. शांतीची आठवण कधीच धूसर झाली होती. आज मात्र ती अचानक समोर होती, स्थितप्रज्ञा सारखी शांत !!! मी मात्र ढवळून गेलो होतो.

      "डॉक्टर एकट्याच गेल्यात, रात्र झाली. त्यांच्या घरून कुणाला तरी सोबत जायला हवं होतं," मी अगास्थाला काळजीने म्हणालो. 

      "सर, डॉक्टरांच्या घरी माझ्याशिवाय कोण आहे?  आणि त्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही. पंचक्रोशीत कुठेही गेल्या, तरी त्यांची मुले लेकरे आहेत काळजी घेणारे! अगास्था हसून म्हणाली.

     "म्हणजे"? मी म्हणालो.

     "सर, या डॉक्टर मूळच्या महाराष्ट्रीयन. कुठल्याशा कारणाने त्यांच्या मनावर आघात झाला. अशांत मनाला शांत करण्यासाठी त्या केरळात निसर्गाच्या सान्निध्यात फिरत फिरत इथे आल्या, त्यांना हे गाव आवडलं. त्यांनी इथेच एका झोपडीत दावाखाना टाकला. आसपास 50 मैलात तेव्हा दवाखाना नव्हता.     

     डॉक्टरांच्या हाताला गुण होता. त्यांनी सेवा म्हणून दवाखाना चालवला. चरितार्था पुरता पैसा त्या घेत. कधी कोणाला त्यांनी नाडले-अडवले नाही. लोक त्यांना आम्मा म्हणतात. किती जणांना त्यांनी मरणाच्या दारातून परत आणले.

     त्यांनी गावात शाळा सुरू केली, लायब्ररी काढली, स्पर्धा परीक्षांचे महत्त्व तरुणांना पटवून देऊन त्यांना पुस्तकेसुद्धा घेऊन दिली. फावल्या वेळेत त्यांचे क्लासेस घेतले. अडल्यानडलेल्यांना त्या फक्त मदतच करत आल्या  आहेत.

      त्यांनी आणि त्यांच्या कामाने प्रभावित झालेल्या लोकांनी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी एक सामाजिक ट्रस्ट स्थापन केलाय. त्यानुसार वेळ मिळेल तसे प्रत्येक जण आवर्जून शांती अम्मा कडे येतात, अम्मा गावासाठी जे सांगतील ते देतात. अभिमान वाटतो त्यांना शांती अम्माची मुले असण्याचा! 

     आसपासच्या 50 मैलात असे एकही गाव नाही, की जिथे आमच्या या डॉक्टर अम्मा हक्काने जाऊन राहू शकणार नाहीत. 

      आता माझेच उदाहरण घ्या. मी शांतीदेवी कडेच राहते. माझ्या वयाच्या सतराव्या वर्षी माझे आई-वडील वीज पडून गेले. मामाने थोडे दिवस सांभाळले. बारावीनंतर लग्न ठरवले, पण लग्नाच्या दिवशीच माझा पती साप चावून मेला. कोण माझ्याशी लग्न करणार आता?  सर्वजण माझ्या नशिबाला, पर्यायाने मला दोष देऊ लागला. जगण्याची इच्छाच मी हरवून बसले.

      अम्माला हे समजले त्यांनी मला इथे आणले. जगण्याची उमेद दिली. नर्सिंग शिकायला लावले. त्यातून मला जगण्याचे साधन गवसले. मला लग्नाबद्दल कित्येकदा सुचवुन पाहिले,  पण मी ठरवले, आता अम्मा सारखंच रुग्णसेवा हे आयुष्याचे ध्येय!! त्यांच्यामुळे मी आज आहे. आता मी त्यांना त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी मुळीच सोडून जाणार नाही. त्यांचाच वारसा मला पुढे चालवायचाय. आफ्टर ऑल  शी इज अवर अम्मा!!!!"

     अगास्था चे बोलणे ऐकून मी सुन्न होऊन गेलो होतो. वारस मिळणार नाही म्हणून जिला आयुष्यातून एकेकाळी मी धुडकाऊन दिले होते,  आपल्या कर्तुत्वाने तिने कितीतरी वारस निर्माण केले होते. 

     मनोमन शांती पुढे नतमस्तक होतो मी. ती खूप पुढे निघून गेली होती माझ्या! 

मी खूप खूप खुजा ठरलो होतो!! खूपच खुजा!!!

Comments

Popular posts from this blog

मनाची अफाट शक्ती

मनाची अफाट शक्ती लुईस या एक अमेरिकन महिला होत्या. त्यांच्या पूर्वायुष्यात वयाच्या 5-15 वर्षांपर्यंत त्यांच्यावर भरपूर शारीरिक अत्याचार झाले. बलात्कार झाले. त्यामुळे त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच इतका नकारात्मक होता की हे संपर्ण जगच वाईट आहे. सर्व पुरुष हे घाणेरडेच आसतात व मी जगायला लायक नाही. ख्रिश्चॅनिटीनुसार त्या ‘नन’  होतात व त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक पुस्तके वाचतात. पुढे वयाच्या 40  व्या वर्षी त्यांना कॅन्सर होतो. जेव्हा त्यांच्या हे लक्षात येते की ज्यांनी हे कृत्य करायचं ते करून निघूनही गेले; त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही. त्रास (कॅन्सर) कोणाला झालाय तर मला. कारण इतकी वर्षं त्या सर्वांबद्दलच्या सर्व नकारात्मक भावना (राग, द्वेष, घृणा) मी धरून ठेवल्या आहेत. जर मला यातून बाहेर पडायचे असेल तर त्या सर्वांना माफ करणे खूप गरजेचे आहे. बरं ज्यांनी ते कृत्य केलं, ते माफ करण्यासारखं होतं का? तर आपल्या दृष्टीने नक्कीच नाही. पण ‘लुईस हे’ यांनी मनाची स्वच्छता केली. त्या सर्व व्यक्तींविषयी मनात असलेला सर्व राग बाहेर काढून त्या सर्वांना मनापासून माफ केले व कोणतेही ऑपर...