अनारसे...
"आता रडणं पुरे कर बेटा,..संकट येतच असतात त्यांना तोंड देत आपल्याला जगावंच लागतं ग,..हे सत्य आहे..हिम्मत हरु नकोस,..नवऱ्याला कंपनीत झालेल्या अपघातात त्याचे डोळे गेले होते,....लवकरच विधवा झालेल्या काकी स्वतःच दुःख विसरून सुरुच्या पाठीवर हात फिरवत तिला समजावत होत्या,.." चारवर्षांपूर्वीच अपार्टमेंट मध्ये लग्न होऊन राहायला आलेली हि सुरू माहेर नाही म्हणुन कोमेजलेली होती,..लहानपणीच आई वडील वारले आणि सांभाळणारी आत्याही लग्नानंतर महिन्यात गेली,.. अजयशी लग्न करून आलेली सुरू पोरकी होती,..पण लाघवी आणि बोलकी होती,..कोणाच्याही हाकेला धावणारी होती,..विधवाकाकीच्या मुलाच्या अपघातात मनापासुन मदत केल्याने सुरू काकीच्या अधिकच जवळ आली,..पहिल्या अधिक मासात काकीने सुंदर अनारसे करून लेक जावई म्हणत वाणही दिलं होतं सुरुला,..एक गोड नातं दोघीत निर्माण झालं होतं,...
आता सुरुला उभं करणं गरजेच होतं,.. आर्थिक अडचणी येणारच होत्या,... सुरूच शिक्षणही फारसं नाही मग काहीतरी उद्योगच करता आला तर असं काकींच्या मनात आलं ,नेमका आलेला अधिक मास काकी फार वर्षांपूर्वी अनारसे बनवून देत होत्या अगदी मोजक्या तीन चार घरी,...त्यांना वाटलं हेच सुरुला शिकवले तर,..त्यांनी ठरवलं आणि सुरुला शिकवलंच,.. सुरू पण सुगरण होती,..चटकन शिकली सुरेख जाळीदार अनारसे तिने पाकिटं बनवले,..काकी म्हणाल्या," थांब जुन्या ओळखी आहेत तिथे फोन करते,.."
सगळीकडून आनंदाने मागणी झाली,..तोंडी प्रसिद्धी होऊन इतक्या ऑर्डर आल्या कि सुरुला रात्रंदिवस पुरत नव्हता,..काकी देखील मदत करत होत्या पण जमेल तशी,..सुरुच्या मनात मात्र जिद्दीची ठिणगी मस्त पेटवली होती काकीने,.. अनारसा शिकवतानाच त्या म्हंटल्या,..हि अनरश्याला चिटकणारी खसखस म्हणजे आपल्या जगण्याची आशा आहे असं समज,..उकळत्या तेला,तुपात सुद्धा ती अनरश्याला सोडत नाही,..आपणही तशीच जगण्याची आशा सोडायची नाही,..संकटांचे चटके बसतच राहणार,..जगणं सुटू द्यायचं नाही,...सुरुला पटलं होतं,..
त्यानंतर कितीतरी अधिकमास येत गेले,..सुरूच छोटं गृहउद्योग आता खुप मोठं झालं होतं,..
बंगला,गाडी ह्यात काकी आणि ते अपार्टमेंट मागे पडलं होतं,..अधुनमधुन भेटी होत होत्या पण कामामुळे सुरुला वेळही मिळत नव्हता,..काकींच्याही मुलाची परिस्थिती सुधरली होती,.. पण मानसिकता मात्र बिघडली होती त्याने काकीला वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला होता,..मधल्या काळात सुरू आणि काकीची भेटच झाली नव्हती,..आज अधिकमासाचा शेवटचा दिवस,..नेमकी खुप मोठी ऑर्डर नेऊन देणारा पोऱ्या आला नाही,.. म्हणुन सुरुने ड्रायव्हरला गाडी काढायला लावली अजय आणि ती दोघेही निघाले,....वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा म्हणाल्या," सगळे पाकिटं ऑफिसमध्ये ठेवा,...."ते पाकिटं उतरवेपर्यंत सुरूआश्रमाचा परिसर बघत होती,..ती स्वयंपाक घराकडे आली,.. तिचा विश्वासच बसेना पलीकडे वृध्दाश्रमाच्या स्वयंपाकघरात
काकी सारखी नाही काकीच त्या स्वयंपाकिनीला अनारसा थापून दाखवत होत्या,.. आणि तेच खसखस, जगण्याची आशा हे सगळं बोलत होत्या,....सुरुच्या डोळ्यात टचकन पाणी आलं,..काकी इथे,..?तिने अध्यक्षांना विचारलं त्या कोण??
उत्तर आलं,.. फार हुशार आणि उत्साही बाई आहेत दोन महिन्यापूर्वीच मुलाने आणुन घातलं आहे,..सांभाळणार कोणी नाही म्हणुन पण खरंतर त्याच सगळ्यांना सांभाळून घेतात,..आज सगळ्यांना जेवणात अनारसे देऊ म्हंटल तर मला म्हणाल्या," तुमचे कार्यक्रमाचे मागवा बाहेरून बाकी इथे जेवणात वाढण्याचे मी शिकवेल आपल्या स्वयंपाकीन बाईला,.. तेवढेच सगळ्यांना ताजे,गरम आणि मऊ अनारसे मिळतील आता या वयात कडक खाता येत नाही,..म्हणून आज सकाळपासून त्या स्वयंपाक खोलीत आहेत,..सुरुच्या डोळ्यातुन घळघळ पाणी वाहात होतं ती अजयशी काहीतरी बोलली,.... मग अध्यक्ष बाईंना म्हणाली,"तुमच्या ऑर्डर मधलं एक पाकीट आणि ताट मला देता प्लिज,.."अध्यक्ष बाई जरा विक्षिप्त पणे बघत हो म्हणाल्या,..सुरुने पटकन ताटात 33 अनारसे ठेवले आणि पळत गेली काकीसमोर,..
"माझं आयुष्य शुन्य असताना त्याला अधिक करून देणाऱ्या लेकीला आज आपल्या आईला अधिकाचं वाण द्यायचं आहे,.. आई आता ह्या लेकीकडे चल,..मला खसखस बनुन चिटकून राहूदे आयुष्यभर तुझ्याजवळ,."
पाणावलेल्या नजरा दुसरं काहीच बोलत नव्हत्या,....काकी डोळे पुसत तिला म्हणाल्या," अग अजय काय म्हणेल,..?"त्यावर अजय म्हणाला,..."काकी डोळ्यासमोर पसरलेल्या अंधारात आशेचा किरण तुम्ही दिलात,..नेहमी सासुनेच काय वाण द्यायचं आज मी वाण देतो जावई बनुन आणि एकच मागतो घरी चला,...."
वाचकहो अधिक मासाच्या शुभेच्छा वेगळ्या विचाराने या कथेतून.

Comments
Post a Comment