Skip to main content

शत्रुबुद्धि विनाशाय

शत्रुबुद्धि विनाशाय…



(दिपावलीचा आजवर कधीही न ऐकलेला आशय)

तुम्ही कधी कोणाशी कडकडून भांडला आहात का? म्हणजे लहानपणीच्या खेळातल्या भांडणापासून ते मोठेपणीच्या रस्त्यावरच्या भांडणापर्यंत कुठेही, कधीही, कोणत्याही कारणानं?

अर्थातच भांडला असालच. कारण कधीच कोणाशीच कोणत्याही कारणानं न भांडलेली माणसं एकतर अत्यंत लेचिपेची, बुळी, दयनीय असतात किंवा अत्यंत महान आणि संतपदी वगैरे पोचलेली असतात.

ही दोन्ही टोकाची माणसं सोडली तर, नॉर्मल माणसं भांडतात! सकारण, अकारण, विनाकारण, कोणत्याही कारणानं आणि कारण नसतानाही भांडतात. जिवलगांशी, नात्यातल्यांशी, शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी, ओळख असलेल्यांशी, अनोखळी माणसांशी, खऱ्या मित्रांशी, ऑनलाईन कनेक्शन्सशी, सगळ्या-सगळ्यांशी भांडतात.

भांडणाला काहीही कारण पुरतं. नवऱ्यानं करपवलेलं दुधाचं पातेलं असो किंवा बायकोनं खारट केलेल्या बटाट्याच्या काचऱ्या. हट्टीपणा करणारे म्हातारे आई-बाप असोत किंवा होमवर्क न करणारा मुलगा. आपल्या पार्किंगमध्ये चुकून गाडी पार्क करणारा शेजारी असो किंवा सिग्नलला आपल्या मागे हॉर्न वाजवत उभा असणारा कोणी अनोळखी माणूस. आपल्या पोस्टवर टीका करणारा अनोळखी माणूस असो किंवा आपल्या पोस्टची खिल्ली उडवणारा ऑनलाईन मित्र.

आपल्या मनाविरुद्ध काहीही घडलं की ते घडवणाऱ्या माणसाशी आपण कडाकडा भांडतो.

आपण भांडतो. चार शब्द बोलतो. समोरचा ऐकतो, चार शब्द ऐकवतो. दोघांनाही राग येतो. रागाच्या भरात दोघंही एकमेकांना भरपूर सुनावतात. मग कोणी एक पडती बाजू घेतो. बाबापुता करतो. सॉरीबिरी म्हणतो. भांडण थांबतं.

हे इथपर्यंतचं सगळं नेहमीच होत रहातं आयुष्यात. ही चहाच्या कपातली वादळं नेहमीच येत रहातात आयुष्यात. खऱ्या आणि ऑनलाईन आयुष्यात, सगळीकडेच.

पण कधी असं होतं की कोणतं एखादं भांडण तिथल्यातिथे मिटत नाही. भांडणातल्या दोन्ही पक्षांना अफाट हरल्याचं आणि रुखरुखीचं फीलिंग येतं. समोरच्याचा आपण सूड घेतला पाहिजे किंवा वचपा काढला पाहिजे असं वाटतं.

आणि मग भांडणातल्या दोन्ही पक्षांपैकी कोणी एक किंवा दोघंही मनात डूख धरून ठेवतात. आपल्या (तथाकथित) अपमानाचा बदला घेण्याची वाट बघत तयारी करत रहातात. दुसऱ्या पक्षातल्या व्यक्तीला आपला शत्रू मानायला लागतात.

एका साध्याशा नॉर्मल भांडणातून, 'आपला कोणीतरी कट्टर शत्रू आहे' असं वाटण्याचा आपल्या मनातला प्रवास हीच ती ‘शत्रुबुद्धी’!

कोणीतरी आपला शत्रू आहे असं वाटायला लागलं की आपण अफाट ‘शत्रुबुद्धीन' वागायला लागतो. आपला शहाणपणा, सारासारबुद्धी, सद्सदविवेक सारं सारं मागे पडतं. आपल्या शत्रूला आपण पाण्यात पहायला लागतो. दिसेल तेंव्हा दिसेल तिथे त्याला ठेचायचा प्रयत्न करायला लागतो किंवा त्याला ठेचण्याच्या संधी शोधायला लागतो. आपल्या शत्रूचं अशुभ आणि अकल्याणच व्हावं म्हणून आपण आपलं स्वतःचं आरोग्य आणि धनसंपदाही स्टेकला लावतो. आपली बुद्धी आपल्या शत्रुबुद्धीकडे गहाण पडते. आपलं वागणं-बोलणं आपली शत्रुबुद्धीच ठरवायला लागते .

एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट पटत नसेल तर कडकडून भांडणं. एखाद्या माणसाशी एखाद्या प्रसंगात जमलं नाही तर कडाकडा भांडून विषय संपवणं हे नॉर्मलच आहे. ते करतच राहिलं पाहिजे. पण अशा भांडणांतून आपल्या मनात शत्रुबुद्धी जागी होत असेल आणि ती आपल्या जगण्याचं मोठं अवकाश व्यापत असेल, तर मात्र आपण जागं झालं पाहिजे.

कारण शत्रुबुद्धीनं आपला स्वतःच्या आणि इतरांच्याही शुभ, कल्याण, आरोग्य आणि धनसंपदेचा अफाट व्यय आणि नुकसान होऊ शकतं.

कोणाशीही कडकडून भांडण केल्यानंतर, तो विषय तिथेच संपला आहे की आपल्या मनात शत्रुबुद्धी निर्माण झाली आहे याचा awareness, जाणीव किंवा स्पष्टता ही एक दीपज्योत असते. आणि ही दीपज्योत प्रत्येक भांडणानंतर आपल्या आयुष्यात प्रकाशमान होणं खूप महत्वाचं असतं.

अशी awareness किंवा जाणीवेची दीपज्योत आपल्या आयुष्यात प्रकाशमान होणं. आणि होत रहाणं ही खरी प्रकाशाची पूजा. ही खरी दिवाळी!

शुभम् करोति कल्याणं, आरोग्यम् धनसंपदा

शत्रुबुद्धि विनाशाय, दीपज्योति नमोस्तुते!

Comments

Popular posts from this blog

मनाची अफाट शक्ती

मनाची अफाट शक्ती लुईस या एक अमेरिकन महिला होत्या. त्यांच्या पूर्वायुष्यात वयाच्या 5-15 वर्षांपर्यंत त्यांच्यावर भरपूर शारीरिक अत्याचार झाले. बलात्कार झाले. त्यामुळे त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच इतका नकारात्मक होता की हे संपर्ण जगच वाईट आहे. सर्व पुरुष हे घाणेरडेच आसतात व मी जगायला लायक नाही. ख्रिश्चॅनिटीनुसार त्या ‘नन’  होतात व त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक पुस्तके वाचतात. पुढे वयाच्या 40  व्या वर्षी त्यांना कॅन्सर होतो. जेव्हा त्यांच्या हे लक्षात येते की ज्यांनी हे कृत्य करायचं ते करून निघूनही गेले; त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही. त्रास (कॅन्सर) कोणाला झालाय तर मला. कारण इतकी वर्षं त्या सर्वांबद्दलच्या सर्व नकारात्मक भावना (राग, द्वेष, घृणा) मी धरून ठेवल्या आहेत. जर मला यातून बाहेर पडायचे असेल तर त्या सर्वांना माफ करणे खूप गरजेचे आहे. बरं ज्यांनी ते कृत्य केलं, ते माफ करण्यासारखं होतं का? तर आपल्या दृष्टीने नक्कीच नाही. पण ‘लुईस हे’ यांनी मनाची स्वच्छता केली. त्या सर्व व्यक्तींविषयी मनात असलेला सर्व राग बाहेर काढून त्या सर्वांना मनापासून माफ केले व कोणतेही ऑपर...